कणवाळा, मोक्षदायी वेल्हाळा
कणवाळा, मोक्षदायी वेल्हाळा, तुजसि बा नमितो ।
नमितो बा, नमितो माझे बाबा, खचितचि हा दास ।
दास हा, खचितचि पापी महा, निष्ठूर मतिमंद |
मंदमती, निष्ठूर मजसम जगती, जीव ना कोणी ।
कोणी ना, जीवउद्धारक भूवना, मजसि तुजविणा ।
तुजविणा, मजसि नाही राणा, नित्यही प्राणसखा ।
प्राणसखा, नित्यही पाठीराखा, दयाब्धी परमेशा ।
परमेशा, दयाब्धी तू अविनाशा, सच्चिदानंदा |
आनंदा, सच्चित् मिळौनि कंदा, शोभे त्रयअंशी ।
त्रयअंशी, शोभे ईश्वर तुजसि, नाम या सृष्टी ।
सृष्टी या, नाम धरुनि राया, व्यक्त झालासि ।
झालासि, व्यक्त स्वयं स्वरूपासि, जीवाकारण ।
कारण, जीवा द्यावया दान, आनंद आपुला ।
आपुला, आनंद मज गरिबाला, हीच तृष्णा ही ।
तृष्णा ही, हीच एकली पाही, प्रेमदासाची ।
दासाची, प्रेम ही तृष्णा साची, मोक्ष कनवाळा ।
कनवाळा, मोक्षदायी वेल्हाळा, तुजसि बा नमितो ॥