संसारपाश स्तोत्र
संसार संगे बहु शीणलो मी । कृपा करीरे दत्तराज स्वामी ॥
प्रारब्धमाझे सहसा टळेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥१॥
नाना विकारी स्थिरता नये रे । त्याचेनि संगे भ्रमती भले रे ॥
अपूर्व कार्ये मन हे विटेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥२॥
माया प्रपंची बहु गुंतलोरे । विशाल व्याधिमधीं बांधलोरे ॥
देहाभिमाने अति राहावेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥३॥
दारीद्र दुःखे बहु कष्टलो मी । संसार मायेतचि गुंतलो मी ॥
संचित माझे मजला कळेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥ ४ ॥
लक्ष्मी विलासी बहु सौख्य वाटे । श्रीदत्त ध्याता मनीं कष्ट मोठे ॥
प्रपंच वार्ता वदता विटेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥ ५॥
अहोरात्र धंदा करिता पुरेना । प्रारब्ध योगे मज राहवेना ॥
हे दुःख माझे कधिही टळेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥६॥
तीर्थास जाता बहु दुःख वाटे । विषयांतरी राहुनि सौख्य वाटे ॥
स्वहित माझे मजला कळेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥७॥
मी कोण कोठूनी आलो कसा हो । स्त्री पुत्र स्वप्नांतचि गुंतलो हो ।
ऐसे कळोनि मन हे विटेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥८॥
असत्य वाक्यानी मुकाची जालो । अनृत्य दोषांत दुःखी बुडालो ।
पूर्व करणीं कसी आठवेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥ ९॥
आनंदमूर्ती भज दत्त सिंधु | चैतन्य स्वामी निज दीनबंधु ॥
अभ्यंतरी प्रेम मनी ठसेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥ १० ॥
विश्रांती देही अनुमात्र नाही । कुलाभिमाने पडलो प्रवाही ॥
अशातूनी दूर कधी पळेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥ ११ ॥
विषयीजनांनी मज आळविले । प्रपंचपाशांतचि बुडविले ॥
स्वहित माझे होता दिसेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥१२॥
या देह दोषा वर्ण कितीरे । उच्चाट माझे मनी वाटतोरे ।
लल्लाट रेषा कधि पालटेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥ १३ ॥
अनाथनाथा प्रभु तुच दाता । मी मूढ की जाण असेच ताता ।।
गोपालमुनी तुज वीसरेना । तुजविण दत्ता मज कंठवेना ॥१४॥
इति श्रीदत्तात्रेय अर्पणमस्तु