अनुताप व्यंजक प्रबंध
स्वानंदरूपा परमेश्वरासि ।
देखोनि दुःखे कृपाळुवासि ।
येउन दाता कर्मक्षितीसि ।
देवोनि ज्ञान मज दोषियासि ॥ १ ॥
तो ज्ञानदाता करुणा गुणाब्धी ।
सांगोनि तेणे मजला त्रिशुद्धी ।
स्वामीद्रोही मी विषयी कुबुद्धी ।
तेणे करुनि न वचेचि सिद्धी ॥२॥
जाणोनि ज्ञानासिही आचरेना ।
धिक्कार ऐसा मज भाग्यहिना ।
कुवासना ते मज सांडवेना ।
तो बोल काइ जीव उद्धरेना ॥३॥
करी नच त्याग कुवासनेचा ।
पुरेच ना स्वार्थही इंद्रियांचा ।
द्रोह करी मी परसाधनाचा |
विपरीत किंदू मज पापियाचा ||४||
मूर्खा जीवा का भ्रमे भुललासि ।
हिताहिता का सुविचारीनासी ।
स्वार्थे करुनि बहु वेष्ठलासि ।
सर्वस्व अंती त्यजुनिच जासि ॥५॥
कखाय वर्मे चित अन्य जाळी ।
तारुण्यामध्ये विषयादि मेळी ।
हे दोष माझे मुळचेच मुळी ।
मी योग्य नव्हे कवणेच काळी ॥६॥
बाळत्व गेले अज्ञान दोषे ।
तारुण्यामध्ये विषयादि पिसे ।
वृद्धत्व आले मग होई कैसे ।
हे रात्रंदी मी बहु चिंती ऐसे ॥७॥
अन्यायी जी मीच अनंत कोटी ।
ऐशाच गेल्या अनंत सृष्टी ।
ते दोष माझे सामाये पोटी ।
तू पाही स्वामी करुणादि दृष्टी ॥८॥
अनंत पापे मज याच देही ।
सृष्ट्यंतरीची गणतीच नाही ।
येथौनि गेलेया मग उर नाही ।
उदास झाला सुरराज तोही ॥९॥
जिवोनि जोडू किती मी अनिष्टा ।
तो ज्ञानदाता मज सांगे इष्टा ।
पापीच मी बेउपकारी नष्टु ।
दोषी सदाचार विहिन दुष्ट ॥१०॥
मुळाधिकारु फळासि आला ।
अव्हेर शास्त्राचरणेच केला ।
कुबुद्धी दोषे मज काळ गेला ।
म्हणुनि विनवी तुज जी दयाळा ॥११॥
करी न शब्दा तुज तारकाच्या ।
न साधुसंगा धरी सज्जनांच्या ।
आश्रय करी मी घरबारीकांच्या |
देखुनि स्वार्थ विषयेंद्रियाचा ॥१२॥
मी गुंतलो जी कर्मादि फासा ।
होईल माझा प्रभु अंत कैसा ।
तुझी कृपाळा करीताए आशा ।
का पावशीना जगन्निवासा ॥१३॥
निष्ठूर त्या देखुनि विश्वमूर्ती ।
देहान्त काळी मज जाचिताति ।
याहून पुढा बहु दुःख देति ।
म्हणूनि येतो तुज काकुळती ॥१४॥
त्वा दूषिले जी जीवदेवतेसि ।
कृपा गुणादि नच त्याज पासि ।
निष्क्षूर का तू मज दोषीयासि ।
प्रार्थ आता मी आणिक कुणासि ॥१५॥
द्रव्यादिकांची मज नाही आशा ।
ध्यानी मनी जी तूचि हो परेशा ।
हे मागतो मी तुज दोषनाशा ।
सन्निधी देई कृपा विलासा ।। १६ ।।
तो क्रूरबुद्धी द्विजराज आला ।
देऊनि प्रेमा निजभक्त केला ।
जाणोनि विनवी तुज जी दयाळा ।
अव्हेर नेदी मज पापियाला ||१७||
ती पूतनादि रिपुवर्गजाती ।
सामाये दोषा विसरौनि खंती ।
देऊन संबंधु करीसि मुक्ती ।
अनंत लीळा नच वर्णवेति ॥ १८ ॥
बंधु निमित्तेविण तू अनंता ।
हे दोष माझे समजौनि आता ।
स्वीकार केलास अनाथनाथा ।
ती लाज माझी तुजजि समर्था ॥१९॥
बुद्धस्वरूपा अनिमित्त दानी |
कृपाळुवा जी प्रभु चक्रपाणि ।
सृष्टानुसृष्टी तुज खंती आणी ।
म्हणौनि गेलासि बीजे करौनि ॥२०॥
आनंदकंदा तू समर्थ होसि ।
प्रभो तरि का उबगौनि जासि ।
माझ्या जीवीचे दुःख जाणतोसि |
चैतन्यबंधा के सोडवीसि ॥२१॥
तो शिशुपाळ रिपुजात भाळी ।
दे तुजलागी शत एक गाळी ।
सामाउनि दोष तुवा अवेळी ।
देसीच मोक्ष मग यज्ञ काळी ॥२२॥
पुरे पुरे हा भवसिंधु आता ।
भोगू किती हे कृपया समर्था ।
सृष्टीत नाही तुजविण दाता ।
रक्षी प्रभु तू शरण अनंता ||२३||
संसारदुःखे बहु पीडलो रे ।
देवा दयाळा मज सोडवी रे ।
हा काळ वैरी मज पीडतो रे ।
कृपाळुवा धावूनि वेगी ये रे ॥२४॥
सृष्टानुसृष्टी तुज शिणविले ।
ते पाप माझे फळासि आले ।
जाणौनि तेणे मज मोकलिले ।
जळो जळो जन्म वृथाचि गेले ॥ २५ ॥
अहो दंदिया मीच या देवतांचा ।
तुम्हाविण नाहीच आश्रय कुणाचा ।
नको अंत पाहूस या दोषियाचा ।
करी अंगिकारू गुर्जर सुताचा ॥ २६ ॥