संकष्टनाशक स्तोत्र
संकष्टनाशक स्तोत्र
श्रीपरेशाय नमः ।
ओं नमो जी श्रीगुरुदत्ता । सकळगुणांचा अधिष्ठाता ।
सकळ सिद्धींचा दाता । संकष्ट हर्ता, तूं मयाळा जी ॥१॥
तूं ऋषिवंशी कुळदिपक । निजमायाचक्रचालक ।
तूं प्रभू कैवल्यनायक । संकष्टनाशक, तूंचि एक ॥२॥
तूं अनादि परात्परा । निजबोधाचिया सागरा ।
मज घालौनि कृपेचा पाखरा । पाव दिगम्बरा, ये समयी ||३||
तूं वरदायक शिरोमणी । संकष्टी पाव निदानी ।
मति द्यावी मजलागुनी । तुझे स्तुति स्तवन, करावया ॥४॥
मी अनाथ अमंगळ पापी । पडलो या दुःखाचे कूपी ।
जो ऐसा कोण साक्षेपी । काढिता यद्यपी, तुजवीण ॥५॥
विनंती माझी तवं चरणी । वारंवार हेचि विनवणी ।
दयेची पाखर घालोनी । संकष्टांची धुनी, करी आता ॥ ६ ॥
तूं जगदुद्धारक दीनबंधु । कृपाळूवा जी दयासिन्धु ।
करी संकष्टाचा वधु । किती अनुवाद, पदपंकजी ॥७॥
मी शोच्य मशक अति हीन । खळ कपटी बुद्धी मळीन ।
परि तुझे श्रीचरण दृढ धरीन । मज आहे कवण, तुज वेगळे ॥८॥
तूं सखा सोयरा मायबाप | हा जीवाचा असे संकल्प ।
दासावरी कां धरिला कोप । तवं चरणी अनुताप, निवेदितो ॥९॥
तुवां भक्तांचे संकट निवारीले । दासा - जना सुखी केले ।
हे ब्रीद पायी बांधिले । दासा रक्षिले संकष्टी ॥ १० ॥
ऐसी वेद श्रुति बोलती । अष्टादशे तुज स्तविती ।
अनार्जित तुझी कीर्ती । संकष्ट नासती तुझे स्मरणी ॥ ११ ॥
ऐसा तू अनार्जित दाता । मी तवं श्रीचरणाची करोनि आस्था ।
ही पुरवावी जी समर्था । संकष्टनाशार्था लक्ष देई ॥१२॥
अऴक संकष्टी पडिला । तो त्रितापे दग्ध झाला ।
दर्शनमात्रे निवविला । क्षणैकी दयाळा, सुखी केला ॥१३॥
संकष्ट पडले ऋचिक ऋषिसी । त्वा शामकर्ण दिधले तयासी ।
संतुष्ट केले रुचिकासी । तूं हृषिकेशी, मयाळा जी ॥१४॥
परशुरामा भेट देऊनी । जनक जननीची अडनी ।
त्वा मूळपिठी स्थापूनी । संकट निवारुनी, सुखी केला ॥१५॥
ऐसा तूं त्रैलोक्याचा दाता । तुझे गुण कीर्ति वर्णिता ।
शीणला शेष आणि विधाता । मी अनाथनाथा, काय वर्णावे ।।१६।।
श्रीदत्ता जी दिगंबरा । आपुले चरणी द्यावा थारा ।
संकष्ट नाशक विघ्नहरा । सांभाळी किशोरा आपुलिया ॥ १७ ॥
सहस्रार्जुनासी संकष्ट पडिले । त्यासी त्वा सहस्र कर दिधले ।
राज्यपदी बैसविले । पारणे केले, सुखाचे ॥१८॥
संकष्टी पडली मदालसा सुन्दरी । ते अळंकाची निज मातुरी ।
विवरी रक्षिली नारी । त्वा भवारी निमिषार्धे ॥१९॥
ऐसी भक्तांची अडणी । त्वा फेडिली जगदेकदानी |
माझ्या धावण्या काय म्हणौनि । न पावसी अजुनी, दयाळा जी ॥२०॥
संकष्टी पडली निजमातुरी । ते तुवां निवारिले भवारी |
तिन्ही देव बाळके निर्धारी । केले क्षणाभितरी, वेळ न लगता ॥२१॥
जय जयाजी श्रीदत्ता । जय जया जीअवधूता ।
अनाथनाथा । पाव आतां, ये समयी ||२२||
जय जया जी भवशोषणा । जय जया जी अत्रिनंदना ।
जय जया जी अमोघदर्शना । पावसंकष्टनाशना, मजलागी ॥२३॥
जय जया जी दिगम्बरा । जयजया जी अनसूयाकुमरा ।
जय जया जी भवहरा । धाव दातारा लवलाहे ॥ २४ ॥
जय जया जी भक्तरक्षका । जय जया जी ऋषिकुळतिलका ।
जय जया जी ब्रह्माण्डचालका । जगत्पाळका, जगद्वर्या ॥२५॥
जय जया जी भक्तवत्सला । जय जयाजी श्रीदत्त दयाळा ।
जय जया जी अनसूयाबाळा । पाव ये वेळा, संकष्टनाशी ॥ २६ ॥
जय जया जी जगन्निवासा । जय जयाजी जगविलासा ।
जय जया जी अमोघवेषा । संकष्टनाशका दयानिधे ॥२७॥
जय जया जी मनमोहना अनंता । जय जयाजी जगजीवना दयावंता ।
जयजया जी करुणाकरा धाव शीघ्रता । मी किती आतां, प्रार्थ तूज ॥२८॥
जय जया जी ऋषिमण्डना । जय जयाजी गुणनिधाना ।
जय जया जी भवभंजना । गणना गहना, अनाम तूं ॥२९॥
जय जया जी आदिपुरुषा । जय जया जी ऋषिवेषा ।
जय जयाजी परमपुरुषा । कां केली निराशा, दयासागरा ॥३०॥
जय जया जी अमळवदना । जय जयाजी व्याघ्राम्बरवसना ।
जय जया जी कमंडलू दण्डधरणा ।जगदुद्धरणा, ऋषिवर्या ॥ ३१ ॥
जय जया जी सह्याद्रिवासी । जय जया जी सैंग ऋषि ।
जय जया जी हृषीकेशी । संकष्टी पावसी, हा भरवसा ॥ ३२॥
जय जया जी दिगम्बरधारी । जय जया जी दानवारी ।
जय जया जी ऋषिकुलोद्धारी । पाव भवारी संकष्टी मज ||३३||
जय जया जी आदिमूर्ती । जय जयाजी मायापति ।
जय जया जी करुणापति । पाव आकांती, ये समयी ॥ ३४ ॥
जय जया जी सैह्याचलवासी । जय जया जी कृपाविलासी ।
जय जया जी गुणराशी । संकष्टी पावसी, हा भरवसा ||३५||
जय जया जी निराकारा निर्गुणा । जय जया जी अमलवाणी अमलवदना ।
जय जया जी रक्तवसना । पाव निदाना, संकष्टी ॥ ३६ ॥
जय जया जी परब्रह्मा । जय जया जी परधामा ।
जय जया जी अनामनामा । पाव आम्हा ये संकष्टी ॥ ३७ ॥
जय जया जी भव भय निवारका । जय जया जी क्तव्याधिरक्षका |
जय जया जी जंतूद्धारका । तू अनादि निजसखा, संकष्टी ||३८||
जय जया जी गुणातीत गुणज्ञा । जय जयाजी निर्गुणा निमग्ना ।
जय जया जी पूर्ण संज्ञा । भक्तरक्षक संज्ञा, जाणशी ॥३९॥
जय जया जी मनरंजना | जय जयाजी विश्वरक्षणा |
जय जया जी श्रमनाशना । संकष्ट दमना, पाव वेगी ॥ ४० ॥
जय जया जी दयार्णवा । जय जयाजी माधवा ।
जय जया जी देवदेवा । निजजनविसावा, संकष्टीचा ॥ ४१ ॥
जय जया जी प्रेमळा । जय जयाजी विश्वपाळा ।
जय जया जी अमळविमळा । धाव दातारा संकष्टनाशी ॥४२॥
धाव पाव गा अघनाशना । धाव पाव गा भक्तरक्षणा ।
धाव पाव गा गुणवर्धना । विधिसुतनन्दना, येई वेगी ||४३||
वेगी येई दीनबंधु । करी पातकांचा छेदू ।
सर्वसिद्धामाजी सिद्ध । जगी प्रसिद्ध, मोक्षदाता ॥४४॥
उशीर न लावी श्रीदत्ता । धावधाव जगदेकदाता |
तुज वांचुनि भवजळी तारिता । कवण आता असे मज ॥ ४५ ॥
नानापरीचे संकष्ट । त्वां निवारिले दुर्घट ।
दासावरी का धरिला वीट । आता करी सेवट, हे दयाळा ||४६ ॥
तुझे चरणी असे ब्रीद | भक्तासी नसे भेद
आता किती करूं खेद । हे सच्चिदानंद, दयाघना ॥ ४७ ॥
दशदिशा अन्नासाठी । आम्हां फिरवीशी जगजेठी ।
स्फटिकांचा पाक कृपादृष्टी । केला संकष्टी, मातेच्या ||४८ ||
ऋद्धी सिद्धी तुझ्या दासी । आम्हां दारोदारी फिरविसी ।
यांत पुरुषार्थ हृषीकेशी । काय विशेषी तवं जाला ॥४९॥
माझे अपराध अगणित । शेषादिका न करवे अंत |
परि तव चरणाचा अंकित । धावधाव त्वरित, संकष्ट नाशी ॥५०॥
अपरिमित माझे अवगुण । परि तुझे कृपेचे वरदान ।
देऊनी करिशी सुज्ञान । मी मतिमंद अज्ञान, अधम पै ॥५१॥
ऐसा मी असे पतित । परि तुझेया श्रीचरणांचा अंकित ।
किती पाहसी माझा अंत । धाव त्वरित स्वामिया ॥ ५२ ॥
संकष्ट पडले देवांसि । तवं तुज प्रार्थिले हषीकेशी ।
देवल महातापसी । तेणे लिंग आकाशी वाढविले ॥ ५३
त्वा हात ठेविला लिंगावरी । पाताळी घातले अवधारी ।
आउठ हात राहिले वरी । अमरेंद्र जयजयकारी, स्तविताती ॥५४॥
ऐसा देवलाचा गर्व खचला । तो श्रीचरणी शरण आला ।
वरदान देऊनी सरता केला । अधिकार दिधला, निद्रेचा ॥५५॥
तूं चहूयुगीचा दाता । चिरायू अवतार अच्युता ।
अद्यापि सह्याख्य पर्वता । क्रीडसी अनंता, अमोघवेषा ॥ ५६ ॥
ऐसा तू ब्रीदाचा साह्यकारी । अमोघ लीळा तुझ्या अवधारी ।
सहा चार अठरा सरोभरी । त्यांशी निर्धारी, पार न कळे ॥५७॥
आगम निगम वेद श्रुति । तयासी पडली असे भ्रांति ।
विश्वव्यापका जगत् पति । करुणा चित्ती, धरी माझी ॥५८॥
आता हेचि प्रार्थना । धाव घेई संकष्टनाशना ।
विश्वतारका विश्वरंजना । हे भव छेदना, अनाथनाथा ।। ५९ ।।
अगाध तुझी अपरिमित शक्ती । अगाध तुझी गुणकीर्ति ।
जय जया जी दयापति । पाव आकांती, दासाचिया ॥ ६० ॥
अनंत जन्मांचा अनाचारी । घोर पातकांचे ओझे शिरी ।
आता कृपा करी जगदुद्धारी । भार उतारी, पातकांचा ॥ ६१ ॥
धावधाव येई धन्या । मज देई अभय अनुज्ञा ।
अगणित तुझी प्राज्ञा । माझी विज्ञापना लक्ष देई ॥६२॥
माझे अपराध अपरंपार । गगन भेदून गेले ढिगार ।
तूं चहूयुगाचा दातार । संकष्टी रक्षी किशोर, चरणीचा ॥६३॥
नमो श्रीदत्ता दिगम्बरा । नमो सह्यांचळी विहारा ।
नमो जी चिरायु अवतारा । अंतकाळीचा सोयरा, तूचि एक ॥६४॥
नमो विभूतिभूषणा । नमो व्याघ्राम्बर वसना ।
नमो विश्वजनका निधाना । पाव अवधूता, संकष्टी ॥ ६५ ॥
नमो भक्तजन पाळका । नमो देव गर्वहारका ।
नमो अनसूया बाळका । निज सुख सखा, आम्हासी तू ॥ ६६ ॥
नमो ब्रम्हांड चालका । नमो मदालसा दुःखांतका ।
नमो सहस्रार्जुना वरदायका । धाव संकष्टनाशका, जगदीशा ॥६७॥
नमो आदि अनादि परब्रह्मा । नमो विश्वनिधाना गुणधामा ।
नमो निज भक्ताचिया विश्रामा । पाव तू आम्हां, ये संकष्टी ॥ ६८ ॥
नमो मनमोहना भगवंता । नमो पर दीपाचिया दाता ।
नमो चिन्मायेच्या भर्ता । हे संकष्टहर्ता, नमो तुज ॥६९॥
नमो परात्परा परमेश्वरा । नमो जीव जातीच्या माहेरा ।
नमो सनातना मोक्षसागरा । धाव दातारा, ये संकष्टी ॥७०॥
नमो आनंदघना चित्परा । नमो सच्चिदानंदा दयासागरा ।
नमो सृष्टिनायक व्यवहारा । नमो वयनागरा निर्गुणा जी ॥ ७१ ॥
नमो नागाशन नगी व्यवहारा । नमो सह्याद्रिवासी गिरीवरा ।
नमो पुराणपुरुषा जीवोद्धारा । वरदायक खरा, तूचि एक ॥७२॥
नमो ऋषिमूळ आदिमाया । नमो भक्तजनाचिया विषया ।
नमो अनसूयेच्या तनया । संकष्टी वाया, कां पाडिले जी ॥ ७३ ॥
नमो अनाथनाथा कृपासिंधू । नमो सनातन दीनबंधू ।
नमो भव-भयनाशका अगाधु । महिमा विनोदु, न वर्णवे ॥७४॥
नमो अनंता अनंतारूपा । नमो अगाधा अमूपा ।
नमो चित्परा चित्स्वरूपा । निरसी भवतापा, स्वामिया जी ॥ ७५ ॥
नमो अव्यक्त व्यक्ता । नमो निर्गुणा अच्युता ।
नमो गुणातीत अगणिता । गुण वर्णिता, शिणला अही ॥ ७६ ॥
नमो मोक्षदायका शिरोमणी । नमो जन्तूद्धारका अघनाशनी ।
नमो ब्रह्माण्डकारका निदानी । संकष्टाची धुनी, करिसी तू ॥७७॥
नमो आदिमाया वल्लभा । नमो पूर्ण कैवल्य गाभा ।
नमो भक्ताचिया लोभा । अवतार स्वयंभा, कां गुंतलासी ॥७८॥
नमो मातापुर निवासिया । नमो आदि अनादि स्वामिया ।
नमो गुणातीत गुणवर्या । पाव सखया, संकष्टी ॥७९॥
नमो मायाविलासी गुणरहिता । नमो ऋषिकुलोद्धारिता ।
नमो सायुज्यदाता । पाव आता, ब्रिदास्तवं ॥ ८० ॥
नमो अनंता अगाधा । नमो सच्चिदानंद बुद्धा |
नमो अमळा विमळा शुद्धा । संकष्टबाधा, दूर कीजे ॥८१॥
नमो जटाजूट विभूती लेपना । नमो अनंतपाणि अनंतनयना ।
नमो कमंडलूपाणिभूषणा । दण्डधारणा ऋषिवेषा ॥८२॥
नमो चिरायु अवतारा । नमो विश्वातीत विश्वंभरा ।
नमो निजभक्ताच्या माहेरा । संकष्ट विदारा, धांव वेगी ॥८३॥
नमो अवतारामाजी शिरोमणी । नमो चैतन्यवल्लभा कैवल्यदानी |
नमो ऋषिमंडना शारङ्गपाणी । ये धावोनी संकष्टी ॥ ८४ ॥
ऐसी करुणा ऐकोनि । संकष्टी धावला कैवल्यदानी ।
अभय आश्वासन देऊनि । निर्भय करोनी, सुखी केले ॥८५॥
तू कैवारी महाराजा । श्रीदत्त स्वामी अधोक्षजा ।
उत्तीर्णता चरणाम्बुजा । कैसिया वजा, होऊ मी ॥ ८६ ॥
वस्त्रालंकार भूषण । ही अर्पावी तर द्रव्य हीन ।
मग रत्न गोमेद हिरण्य । ही कोठोनी प्राप्त रंका ॥ ८७ ॥
कैसेनि करीन (अर्पिन) तुज पूजा । ऐसा मी आळसी महाराजा ।
दारिद्र भावार्थ माझा । येणे तवं पूजा, कैसी होईल ॥ ८८ ॥
जरि मी दीन दुर्बळ । परि तुझा म्हणवितो केवळ ।
तूं जननी कनवाळू दयाळ । तरि भावार्थ फळ, अंगीकारी ॥८९॥
तूं दीन दुर्बळांचा सारथी । ऐसी वदे त्रैलोक्य भारती ।
मी अनाथ तू दीनाचा पती । करी शांति, मम हृदयी ॥ ९० ॥
राव अथवा रंक । तुझे चिंतिती पदपंकज ।
दोहोची साम्यता एक । भावपूर्वक, तुझे चरणी ॥ ९१ ॥
तूं तव भावाचा भोक्ता । मी तवं चरणाची करौनी आस्था ।
भावाभाव सर्व जाणता । जाणसी जीवजाता, अंतर्यामी ॥९२॥
जरी मी हीन दीन पतीत । पूजा अंगिकारी प्रीत्यर्थ ।
माझा नसे शुद्ध भावार्थ । तरी पूजार्पित तुजलागी ॥ ९३ ॥
भाळ ठेउनि श्रीचरणी । प्रेमाश्रु जीवन प्रक्षाळुनी ।
लज्जा वस्त्रे परिमार्जुनी । अर्चीला निदानी, कैवल्यदाता ॥ ९४ ॥
भावार्थ हाच नैवेद्य जाण । प्रेमाश्रु हेचि जीवन ।
संकल्प केला दृढ मन । श्रीदत्तदयाघन, अंगीकरी ।। ९५ ।।
शांति हीच नागवेली साचार । काम क्रोध मत्सर ।
हीच सुपारी करोनी चूर । काथ साचार, विवेक हा ।। ९६ ।।
अहंकार जाळुनी चुना । तुज अर्पिला जी दयाघना ।
भावार्थ कापूर जाणा । जीव ज्योती गहना, ओवाळिली ॥९७॥ ।
ऐसी अर्पिली तुज पूजा । अंगिकारावी श्रीदत्तराजा ।
आळशी भावार्थ माझा । तूं महाराजा, गोड करी ॥ ९८ ॥
ऐसा द्यावा जी वर । संकष्टी पावेन पठणमात्र ।
आश्वासोनि किशोर, भव संसार छेदी हा ॥ ९९ ॥
आळस नसावा तुझे स्मरणी । निशिदिनी असावा तू हृदयस्थानी ।
करावी संकष्टाची धुनी । तव सुखसदनी असो सदा ॥ १०० ॥
हेच मागतो पुढती पुढती । श्रीचरणी राहो माझी मति ।
कृपाळुवा जी चैतन्यपति । देई अंती प्रेमदान ॥ १०१ ॥
तुझे स्मरण करितां । संकष्टी पावे अवधूता ।
राजभय चोरघाता । विघ्ननाशार्था, वेगी पावे ॥ १०२ ॥
हे संकष्टनाशक स्तोत्र । पठण करिती नारी नर ।
तयांसी होआवा वर । अभयकर, ठेवावा ॥१०३॥
विनंती माझी तव चरणी । कृपा करावी जगदेक दानी ।
दयेची पाखर घालुनी । नित्य पठनी रक्षावे ॥ १०४॥
इति श्रीसंकष्टनाशक स्तोत्र । हे साराचे सार पवित्र ।
आदरे बोलिला किंकर । श्रीचरणी नमस्कार करोनिया ॥ १०५ ॥
इति श्री परमर्धे महामोक्षैकसाधने श्रीनागार्जुनोपदेशे शिवमुनिविरचितं संकष्टनाशकस्तोत्रं सम्पूर्णम् शुभं भवेत् ॥