प्रबंध - श्रीदत्तनाम हे वंदु आदरे
श्रीदत्तनाम हे वंदु आदरे ।
बंध सोडवी नाम साजरे ।
कामवासना तोडि कल्पना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १ ॥
सिंह शीखरी राज्य तो करी ।
आदि शक्ति ही घेउनी बरी ।
अनंत रूप तू दाविशी जना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ २ ॥
नास्ती पाणि हा भूपती भला ।
धूप दाउनी तोखवी तुला ।
सांडी सांडिरे हस्त दहना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना || ३ ||
नास्ति पाणिमे दत्त सुंदरा ।
बाप माउली बंधु सोयरा ।
सहस्त्र भूजा तू देइ भूषणा ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ ४ ॥
पारधी रूपे खेळशी वनीं ।
विप्र कामिनी मारिली झणी ।
नाचरे कदा मोक्षमंडना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥५॥
जननी म्हणे पुत्र सज्जना ।
नेई तू मला दत्त दर्शना ।
ओळखी नसे अत्रिनंदना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ ६ ॥
कावडी तुझ्या कोंभ फूटला ।
त्यासि देखता दत्त भेटला ।
खांदि कावडी दत्त चिंतना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥७॥
मांस कावडी देखिली वनीं ।
कोंभ फूटला हर्षला मनी ।
धन्य धन्य तू सृष्टिमंडना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥८॥
पाय वंदिता दत्त बोलिला ।
शंबशंबली दूर ठाकला ।
मोक्षदायका आणिले मना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ ९॥
आत्मरूप हे दाविलें तुवा ।
माय-बाप जी चूकवी भवा ।
दीन वत्सला भक्तभूषणा ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १० ॥
मारि बाण तो आणि जीवना ।
स्नान कृत्य हें साधि आपणा ।
ऋद्धपूर हे घेई दक्षिणा ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ ११॥
तृप्त होय तो भूपती भला ।
सौख्य सागरू त्यासि भेटला ।
शंबरांबली वाणी वर्षणा ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १२ ॥
हस्त मस्तकी ठेविला बरा ।
बंधमुक्त तू राजकुमरा ।
मायने मला धाडिलें वना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १३ ॥
पंचराव हा भूपति भला ।
ब्रह्म राक्षसी शीघ्र मारिला ।
होत साह्य तुं त्यासि सज्जना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १४ ॥
त्याच लागी त्वा तीर्थ निर्मिले ।
आत्मतीर्थ हे नांव ठेविले ।
तेथ खेळसी अत्रिनंदना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १५ ॥
आत्मतीर्थ हे गौतमी आधी ।
स्थापिले तुवा श्रीकृपानिधी ।
वंद्य तीर्थ हे सर्वही जनां ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १६ ॥
पद्मआसनीं देव बैसला ।
सर्वशक्तीशी पूर्ण शोभला ।
सत्ब्रह्म तू पंचकारणा ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १७ ॥
सृष्टि हिंडता मूर्ती शीणली ।
स्वर्गवाणि ही काय बोलली ।
शरण जाय तू अत्रिनंदना |
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ १८ ॥
शीघ्र तातडी धावतो कसा ।
ओघ सागरी गंगेचा जसा ।
दृष्टी देखिले अत्रिनंदना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥१९॥
पाय वंदुनी बैसला कसा ।
माय भेटली जेवि पाडसा ।
श्यामकर्ण हे देई सज्जना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ २० ॥
मेघ ओळला जेवि अंबरी ।
पावशी म्हणे बोल वैखरी ।
पाहुनी पुढे सुत वचना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥२१॥
पाडसा वनी अग्नि लागला।
नाम चिंतिता मेघ ओळला ।
पावलासी तूं पुत्रमंडना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥२२॥
लीळा पाऊले खेळ दाविला ॥
गोरखी भला पूर्ण बोधिला ।
इच्छिली तुम्ही पूर्ण वासना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ २३ ॥
शंकरू म्हणे ब्रह्म सागरा ।
चूकवी भवा दत्त अंबरा ।
माझिया किजो मान्य दर्शना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ २४ ॥
व्याघ्र वेषि त्वा भेट दीधली ।
ज्ञानशक्ति ही पूर्ण स्थापिली ।
मस्तकी तुझा हात सज्जना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ।। २५ ।।
पराशक्ति ही घेउनी बरी ।
अनंतरूप तो जीव उद्धरी ।
दान देई गा जाय बावना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥ २६ ॥
दिव्य आसनी देव बैसला ।
सन्मुखा निका शिष्य राजला ।
मेरूवाळेया जाति भोजना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥२७॥
संत पंकजी शीर ठेविलें ।
दत्त चिंतनी चित्त रंगले ।
डिंभ केशवा सांडि नामना ।
हे दयानिधे श्रीकृपाघना ॥२८॥