श्रीकरुणा स्तोत्र
करुणा स्तोत्र
सिंहाद्री वासु चहुयुगी तुझा ।व्याघ्रादि वेषाधरी स्वामी माझा ।
ऋणानुबंधे घडला सबंधु । कृपा करावी अनिमित्त बंधु ॥ १ ॥
विज्ञप्तीभावी तुजलागी आता । साह्य करावे मजला जी दत्ता ।
दुःखार्णवी मी बहु होत दग्धु । कृपा करावी अनिमित्त बंधु ॥२॥
कृपा करोनी मज नीववावे । त्या पंकजाचे मज दास्य द्यावे ।
द्वेषी कखाई बहु कामक्रोधु ।कृपा करावी अनिमित्त बंधु || ३ ||
येई जी दत्ता प्रभु माय बापा ।कृपा करोनी हरी दुःख तापा ।
देवाधिदेवा अनंतु अगाधु | कृपा करावी अनिमित्त बंधु ॥४॥
येई जी दत्ता करुणा मी भावी । स्वरुप तुझे मजलागि दावी ।
तू आर्तदानी करुणादी सिंधु । कृपा करावी निमित्त बंधु ॥५॥
द्वेषी खाई मदमत्सरी मी । तेणे करोनी तुज नावडे मी ।
तो बोल काई मीच गर्भआंधु । कृपा करावी निमित्त बंधु || ६ ||
नवीना बा हीत नाही मीना । देखो तुझेवीण मी किलवाणा ।
तू माय माझी करी आत्मबोधु । कृपा करावी अनिमित्त बंधु ||७||
आनंदकंदा प्रभूराजिया तू । दत्ता दयाळा मज भेट दे तू ।
भावादिकाया तुज अर्पिली जी । श्रीदत्तराजा मज भेट दे जी ॥८॥
म्या शिणविले तुजलाही सृष्टी । अन्याय माझा न सामाय पोटी ।
कृपा करोनी मज निववीजी । श्रीदत्तराजा मज भेट दे जी ॥९॥
सांभाळ माझा करी दत्त राजा ।तुजविण नाही सृष्टीसी दुजा ।
कोट्यान्कोटी अन्यायी मी जी । श्रीदत्त राजा मज भेट दे जी ॥१०॥
अव्हेरु नको शिणलो दयाळा । मातेपरी त्वा सांभाळ केला ।
तू त पुरवी मनकामना जी । श्रीदत्त राजा मज भेट दे जी ॥११॥
कृपा करावी प्रभु आर्तदानी ।अनाथ नाथा हरी ताप तिन्ही ।
मी सर्व भावी शरण तुला जी । श्रीदत्तराजा मज भेट दे जी ॥१२॥
योग्यांत दिगंबर दिव्यमूर्ति । नाम स्मरता त्रयतापजाती ।
मनोर्थ माझा पुरवावा आजी । श्रीदत्तराजा मज भेट दे जी ॥१३॥
भवदी जी बहु शीण आला । येई जी दत्ता किती प्रार्थ तुला ।
धाऊनि मातेपरी तू येई जी । तू श्रीदत्तराजा मज भेट दे जी ॥ १४ ॥
पंचाळपुरा तुम्ही स्थापियले । विज्ञानेश्वरा बहु मान्य केले ।
लिंगाप्रति रोवूनि मुष्टिकेसी । केंव्हा जी दत्ता मज भेट देसी ॥ १५ ॥
हे करुणा स्तोत्र श्रीदत्तात्रेयाचे | त्रिकाळ पढती सौभाग्य त्यांचे ।
दारिद्र्य नासे निज कार्यसिद्धी ।त्रिताप जाती मिळतो सुखाब्धी ||१६||
पंचाळपुरी बहुरम्य जागा । चरणोद वाही निर्मल गंगा ।
चरित्र ऐसे महिमा पुराब्धी । त्रिताप जाती मिळतो सुखाब्धी ॥१७॥
वेदास तुझी न कळेचि थोरी । भक्तासी रक्षुनी विघ्नासी हरी ।
कृपा करोनि मज ने तू आधी । त्रिताप जाती मिळतो सुखाब्धी ॥ १८ ॥
उशीर झाला मज सोसवेना । किमीप आता धीर धरवेना ।
कृपा मी भावी मज ने सन्निधी । त्रिताप जाती मिळतो सुखाब्धी ॥१९॥
सन्निध तुझी मजलाही लाभो । श्रीमूर्ती तुझी मज दावी प्रभो ।
अनाथनाथा वर दे दयाब्धी । त्रिताप जाती मिळतो सुखाब्धी ॥२०॥
श्रीदत्तराजा मार्गादि मूळा । हे करुणा स्तोत्र विज्ञप्ती माळा ।
दे दे जी दत्ता मजला सुबुद्धी । त्रितापजाती मिळतो सुखाब्धी ॥२१॥
श्रीपारमांडल्य मुनि आम्नाये |नाम अभिधान धनुष्य पाहे ।
तत्सुत संतू ध्याये आत्मशुद्धी (आत्मबुद्धी) । त्रिताप जाती मिळतो सुखाब्धी ॥२२॥
इति श्रीकरुणा स्तोत्र समाप्त