अथसंकष्ट वज्र पंजरु
:
परमेश्वर श्रीचक्रधर वरप्रसादे गुरू निरुपणे संकष्ट वज्रपंजरू सांगैन : जेणे चतुर्विध स्मरण मात्रेण सकळ मनोरथ मनोकामना पूर्ण होती होका तर संकष्ट वज्रपंजरु हे नाम कीमर्थः ना सर्वज्ञे म्हणतिले “शरणांगताचा वज्रपंजरु असे : परि जीवे शरणांगता होआवे की " : तर तोचि कैसा पा यातवं आता स्मरण अनुक्रम सांगता असिजे जीवप्रपंचव्यतीरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर एक आति : तो सर्वशक्तियुक्त : ऐसा चैतन्यापर परमेश्वर तो देव श्रीचक्रधर सकळ जीवाते रक्षीता हो : उद्धरीता हो : तो चांपेगौर : राजस : तेजस : वेल्हाळ श्रीमूर्ति सुरंग सकुमार : ध्वज वज्रांबुज : पद्माकुशांकित श्रीचरणकमळ उंच धूरा : सुकुमार तळवे : तळवा उर्ध्वरेषा चन्द्र बींबाकृती नखे : सरळ पोटरीया घन पीटिलीया तैसीया मांडीया : सुरंग, मनोहर, जघन उंच चौरस घनवट बरवा कटीप्रदेश : सखोलनाभीरंध्र वळित्रय । शोभायमानः मृदुतर रोमावळी: विशाल वक्षस्थळ : ठोसरे निघोटे : नितळे मुडपे : सरळ ओहरत बरवे अजानबाहु: शरणांगता अभयदानी श्रीकर कमळ : सरळ आंगुळीया : चन्द्रबींबाकृती नखे : त्रिरेषा अलंकृत श्रीकंठ : आलोहीत ओष्टपुष्ट : हीरे लग दंतपंक्ती : प्रहसीत मनोहर श्रीमुखकमळ जो भव भयसंतप्त त्यासी वरदकारक : सरळ नासापूट : आरक्त सुप्रसन्न आकर्ण विशाळ कृपालोचन : सुरेखा वंकटा भवैया : डावीये भवईवरी कांदी : उंच कपोळ : लंबकर्ण : नितळ ललाट : बरवा मनोहर श्रीमुकुट : लघु ना दीर्घ : वरीसा पंचवीसा सत्तावीसा भितरी वए दिसे : ऐसी श्रीमूर्ती कटीप्रदेशी प्रसन्न दुटी वेढली असे : फुटा प्रावरण भाळ प्रदेशी गोपी चंदनाचा उर्ध्वपौंड्र टीळा रेखीला : सर्वांगी यक्ष कर्दमाची भवरी श्रीकण्ठी गळदंडा : श्रीमुगुटी मुगुटमाळाः श्रवणी झळंबुके बाहुभुषणे कळीयाचे हातसरे :श्रीकरीं पुष्पांचा स्तबकु :ऐसा सर्वांगी सुंदर अलंकार मण्डित : गुणधर्मीयुक्त लावण्य सौन्दर्य : औदार्य : सौभाग्य आथीली श्रीमूर्ती तया संपूर्ण अवतारा सर्व शक्तीयुक्ता श्रीचक्रधरराया गोसावियांचे चरण शरणः ॥ इति मुर्तिज्ञान ॥
आता प्रार्थना सांगता असिजे
जीवोद्धारण व्यसनधारका ! विशाळ नेत्रा ! विशालदेवनंदना ! माल्हनीकुमरा! : कमळा वल्लभा ! : शरणागता वज्रपंजरूवा ! : तु माय बाप सखा सुहृद सांगाती अनिमित्त बंधू आर्तदानी : अनाथनाथ : भक्त काज कैवारी व्यक्तमंत पूर्णकामना मनोरथ सिद्धिदायका, तू सेव्य मी सेवक : डींगरा विषयप्रमादिया : ईश्वरद्रोही : स्वामीद्रोही : गुरुद्रोही : मार्गद्रोही : परिवार द्रोही : मित्रद्रोही : कर्मचांडाळ : प्रतारक : आत्मघातकी : विश्वासघातकी : स्वार्थी : विश्वहननी अप्रतिष्ठ विमुढ : योगभ्रष्ट : अंतराई : वर्मस्पर्शी : नित्यनरकी : कखायी : विषयकृमी : ऐसीया माते अपवित्राते पवित्र करोनी रक्षावे जी : स्वामीया श्रीचक्रधरराया गोसावियाचे चरण शरण ।
अभयदान ( आता रक्षण)
परमेश्वर पुरुषार्थ लाभापासौनि लाभ : जी धर्म, अर्थ, काम, मोक्ष मम सकळ पुरूषार्थ पूर्ण करावे जी : आर्तदानी माझी सकळहि आर्त पुरवावी जी : आंधळ्या नेत्रदानी मम नेत्रद्वयासी रक्षावे जी : भक्तीजन विनंती स्वीकारका मम कर्णद्वयासी रक्षावे जी : अजानबाहू मम हस्तद्वयासी रक्षावे जी : उभयगंगातीरी तीर्थ करणारा मम पादद्वयासी रक्षावे जी : वासनिये मुकीया वाचादानी मज वागीश्वरी सिद्धी द्यावी जी : भक्तीजना पुष्टीरक्षणा मम पुष्टभागी रक्षावे जी : दयाळूवा मम सर्वांगासि रक्षावे जी : कृपाळुवा मम कर्मेंद्रियासी रक्षावे जी :कणवाळुवा मम ज्ञानेंद्रियासी रक्षावे जी : मयाळूवा मम अंतःकरण चतुष्टयासी रक्षावे जी : वयस्तंबिनी विद्यास्विकारका मज सर्वसिद्धी द्यावे जी: अच्छेद्या अभेद्या मज शस्त्र घातापासौनि रक्षावे जी : ब्रह्मसान विषनाशका मज सकळ विषापासौनि रक्षावे जी : महादाश्रम कार्ये विध्वंसना मज मंत्र यंत्रादि सकळहि जारण मारणादि पासौनि रक्षावेजी : दायंबा, विघ्ननाशना मज सकळ देवता विघ्नापासौनि रक्षावे जी : पंचकुळाचार्या ग्रह निवृत्तिकारका मज ब्रह्मग्रहादि भूतापासून रक्षावे जी : सकळहि निरोध परिहारका मज नवग्रहादि अदृष्टापासौनि रक्षावे जी : काळस्फोट व्यथा हरणा मज सकळहि रोगापासून रक्षावे जी : रेइनाईका तथा गोवारी ज्वरनिवृत्तिकारका मज सकळ ज्वरापासून रक्षावे जी : सर्प द्वयपतना मज सर्पभयापासून रक्षावे जी : निळभट्टा इंगळी विषहारणा मज वृश्चिकादि भयापासौनि रक्षावे जी : महिषा रोषहरणा मज पशू उपद्रवापासौनि रक्षावे जी : व्याघ्र कुमतीहरणा मज व्याघ्रादि स्वापदापासून रक्षावे जी : चोर सांगाती सोडणारा मज चोर भयापासून रक्षावे जी : हेमाद्रि सैन्य विध्वसंना मज शत्रुघर्षनी रक्षावे जी : भगवद्ग्रहणीके उभयाजयोकारका मज वादी जैत्य करावे जी : कान्हरदया महादेवराया वेधका मज राजद्वारी रक्षावे जी : पांडेया स्वप्नी नाम स्वीकारका मज दुष्ट स्वप्नभयापासून रक्षावे जी : पुरप्रविष्ट स्त्री तारणा मज जलभयापासून रक्षावेजी : सीतळरुपा मज अग्नी भयापासून रक्षावे जी : तैल्यकारा कुमतीहरणा मज दुर्जनाची कुमती हरावी जी : साधा अभयदानी मज अभय द्यावे जी : बाईसा प्रेमदानी मज प्रेमासी पात्र करावे जी : नागार्जूना वरदानी मज सकळहि वरद करावे जी : कैवल्यदानी मज सकळहि दानासि योग्य करावे जी : 'सिद्ध रे सिद्ध' बोलुन आपणेयाते प्रकाशका मज सकळहि सिद्धि द्यावी जी : मज आपणेयाते प्रकाशावे जी : एळापुरी उपाध्याप्रति स्वयंप्रकाशका मज तेव्यश्रीमूर्ति दाखवावी जी : पाणिपात्र कारका माझे पाणिपात्र स्वीकरावे जी : (माझे भिक्षान्न स्वीकरावे जी ) : मंगळ अवलोकना मज दसदिशा रक्षावे जी : मज कृपादृष्टी अवलोकावे जी : संपूर्ण शक्तिस्विकारका माझी सकळ मनोकामना पूर्ण करावे जी : खिरारीया सीख लावका माझेया पापाचे डोंगर नासावे जी : श्रीचक्रधरराया गोसावियाचे चरण शरण : ||: ऐसे हे संकष्ट वज्रपंजरू आपण स्मरिजे का आणिकाकरवी स्मरविजे तेणे परमेश्वर तयाचे सकळ संकष्ट परीहरती : का 'पुरूष प्रयत्नी दैवाचे साह्य' : तथा 'तू उभा ठाकलासीची पुरे, सिद्धिते एथौनिचि नेईजैल कि' : म्हणौनि संकष्ट स्मरणी निर्वेद : अनुताप : अनुशोच आर्तिपूर्वक आठविजे : तयाची परमेश्वर सकळहि आर्त पुरविती : कां पा आर्ताते परमेश्वर वाडोवाडी गिवसिती : आणि आर्ति करूनि एथचि दसीचि धरीली पुरे : ऐसे हे संकष्ट वज्रपंजरू आर्ताप्रति बोलावे : नाही तरि लोहे पाणी गीळीले ऐसे होउनि असावे : ऐसे हे संकष्ट वज्रपंजरु उत्तराभिमुख बैसोनि पश्चात प्रहरी स्मरण कीजे तरि एका मासा तथा द्वीमासा अथवा तीन मासा तथा षण्मासा मनोकामना पूर्ण होती : एदर्थी संशय नाही हे सदाकाळी स्मरिजे : । एवं इति श्री ओंकारमुनि विरचित संकष्ट वज्रपंजरू संपूर्ण : ||