श्रीदत्त प्रबंध
छंद मालिनी
नमन तुज श्रीदत्ता अत्रिऋषीकुमारा ।
मजवर करि कृपा दे पदांबुजी थारा ।
करद्वय करि पूजा वाक्पुष्पार्चनाची ।
जय जय प्रभुराया आरती अंतराची ॥१॥
स्तवन करिन तुझे तोष होईल स्वामी ।
जन्मुनि ऋषीवंशी वास सह्याद्रिधामी ।
उभय नट नटोनी मानवी वेषधारी ।
विहरण करिता गौतमी तटतिरी ॥२॥
छंद-कामदा दत्तराजिया मागतो तुला ।
स्तुतिकारणे यश दे मला ।
जेवि बाळकू आळ घे रडे ।
तेवि जननी सांकडे पडे ॥३॥
वस्तु ठेउनी गहाण आपुली ।
आळ पुरवी माय माऊली ।
तेवि अवधुता आर्त पुरवी ।
मायमाउली दोष चुकवी ॥४॥
छंद - मत्त गयंद (सवाई
श्रीदत्तराज अजी महाराज तुला नित्य लाज मी बाळक आहे ।
चातक आस करी घनवास तसा तव दास स्मरू नित लाहे ।
चंद्रचकोर करी नित घोर तो वर्षे तयावर अमृत धारी ।
तसा मज स्वामि रक्षि अरामि तुजा निजधामि तु तारि तु तारि ॥५॥
दत्त दयाघन तोडिसि बंधन अनुसुयनंदन कीर्ती दिगांती ।
वेद चतुः पर नेणती ते षडुशास्त्र मती तेथ आगम की ।
वर्णि खगारि पढे नित घोर म्हणे मुरारिसी काय मी वर्णू ।
तेथही मानव नेणति तांडव तोषेल माधव जाइल सी ॥६॥
छंद - विबुधप्रिया
बारे द्वादश चौकडी नित अंती हे प्रति भोगिली ।
देवतासि नये घृणा तुज वांचुनी नसे माउली ।
जडताप ग्रही अपार हे दुःख म्या बहु पाहिली ।
धांव धांव कृपाघना जसी श्रीप्रभू कृमि तारिली ॥७॥
अशन करितां प्रभू जड योजिता जिव रक्षिला ।
एक अंग असे तया उभय नट म्या तुज देखिला ।
मदलसे सप्त पुत्रत्वा स्विकरोनिया वर दिधला ।
त्या परी मजला करी तुज आपुला जिव अर्पिला ॥८॥
छंद - स्वागता
भार्गवी जननि स्थापुन देवा ।
भेट देउनि तयासि विसावा ।
त्यापरी मज दिजे प्रभु भेटी ।
ऊपडी समुळ संश्रृति काटि ॥ ९ ॥
ज्ञान देउनि यदू निववीला ।
तेच दे मज प्रभुजी सुकाला ।
पारधी नट नटोनी श्रीदत्ता ।
बैसवी निजफळी जिवजाता ॥१०॥
छंद - वसंततिलका
सहस्त्रार्जुने करधुपे तुज तोषवीले ।
सहस्त्र बाहु वळयांकित राज्य दीले ।
तैशापरी जरि प्रभू तुज तोषवीता ।
अंकावरी दशमते मज राज्य देता ॥११॥
देवल्य आश्रम पवीत्र केले श्रीदत्ता ।
सह्याद्रि पर्वत जिवास संबंध देता ।
ते धन्य धन्य जिव पै कणवाभिधानी ।
जेथे विहार करितो प्रभू चक्रपाणी ॥१२॥
आळकासि दत्तराज भेटताचि शांतला ।
मीच पापरूप जी म्हणून लोभ आटला ।
जननीसि नीरजरी गांजिताची पावला ।
मीच पापरूप जी म्हणून लोभ आटला ॥ १३ ॥
शंकरासि मागताचि वर शिघ्र दीधला ।
मीच पापरुप जी म्हणून लोभ आटला ।
पांचालराव चिंतिताचि संष्कटासि धांवला ।
मीच पापरूप जी म्हणून लोभ आटला ॥ १४ ॥
छंद - वसंततिलका
जंबूक संज्ञिक पुरा प्रभू नित्य जाये ।
भिक्षाटणे करुनिया अधिकार होये ।
प्रेमामृते करुनिया जिव निवविले ।
ते भाग्य नाही मजला मनि गर्व डोले ॥ १५॥
छंद - शार्दुलविक्रीडित
पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी माध्यानकाळी प्रभू ।
नित्यानी करि भोजना सुरपती त्या आत्मतीर्थी विभू ।
संध्याकाळ प्रवर्तता गतकरी मातापुरी पहुड हो ।
ऐसा खेळ करी सह्यांद्रिशिखरी श्रुष्टांतरी नित्य हो ॥ १६ ॥
श्रीदत्ता तुज विनंती करितसे मी डींभ आहे तुझे ।
ठेवी श्रीकर मस्तकी उतरीजे या संसृतीचे वोझे ।
नाही ज्ञान विराम भक्ति त्रिकहा सांभाळ माझा किजे ।
जैसी पक्षिण बाळका परवसी पाखातळि रक्षिजे ॥१७॥
छंद-शिखरिणी
श्रीदत्ता तूं माता जनक भगिनी तूंच चुलता ।
श्रीदत्ता तूं बंधू जिवलग सखा तूं निवविता ।
मला नाही कोणी तुजविण वनामाजि दुसरा ।
परदेशी मी आहे भवनदि मला पार उतरा ॥१८॥
जळावीणे जैसी पडत सफरी ती तगमगी ।
तसा मी श्रीदत्ता तुजविण जळे या कलयुगी ।
जसी धेनू वत्सा दुरुन दिसता हांबर करी ।
तसी माजी माता करुनि ममता पार उत्तरी ॥१९॥
छंद - भुजंगप्रयात
नको देवता हस्तकी देउ दत्ता ।
तया कीव नाही मला हीच चिंता ।
जसी जननी बाळका थाप मारी ।
परि आणिका बोलता क्रोध भारी ॥ २० ॥
किंवा दासि जैसी समर्था प्रभूची ।
तिला तोचि गांजी तिला लाज कैची ।
अहो दुसरा गांजिता लाज भारी ।
तसा दास मी दत्तराजावधारी ॥२१॥
छंद-मंदाक्रांता
श्रीदत्ता तूं मजचि करिता व्यक्त जाला महीसी ।
आद्या शक्ती पुर नटधरी बद्रिका स्थानवासी ।
तेजोनीया भवनत्रिक हा स्वात्म सुखविलासी ।
आता का बा दूर धरियले खंत आली तुम्हासी ॥२२॥
माझे तुलावगुण कळले तर कां व्यक्त जाले ।
श्रृष्टाश्रृष्टी अढळ रचिले जीव का सृजियले ।
अव्यक्ती पै वीटक उचलिला उद्धरु जीवरासी ।
दया मया कृपादी करुणा नामना की तुम्हासी ॥२३॥
छंद - तोटक
प्रतिपाळक तूं भक्त म्हणविसी ।
तर का मजला दुर तूं धरसी ।
जरी पालव म्या धरीला बळेसी ।
मज लोटु नको शरण तुम्हासी ॥२४॥
छंद - भुजंगप्रयात
ऐसी वाक्पुष्पी गुंफूनीया माळा ।
पुजू दत्तराजा विसा पंच दळा ।
कवी गोपी सुता वरदान दीजे ।
विदू शीव (मुनि) म्हणे प्रतीपाळ कीजे ॥२५॥