एकांकीचा देव ओवाळू
एकांकीचा देव ओवाळू जीव कर्पूर ज्योती ।
लीळा स्मरीता रजतम पापे विलयाला जाती ॥धृ० ॥
भरवस नगरी प्रगट होऊनी क्रीडला परमेश ।
क्रीडत क्रमाने येता झाला श्रीप्रभू भेटीस ।
विरक्त अवस्था अंगिकरुनी आला कांतीस ।
पुढा विंध्याचल पावन करण्या मुक्ताबाईस ।
ससा रक्षीला जानू स्थळी चुकविली दुर्गती ।
गोंड भिल्ले बोल्हा बारी भक्त वर्णु किती ॥१॥
आंध्रप्रदेशी भक्त हेडावू हंसाबादिक ।
चर्मकार सुखी करुनी सांडीला घोडाचुडी शिष्य ।
दाभविहीरी विप्र वेधला रुपनायक ।
डाक सेंदुर्जन भोग भंडारा अळजपूर निक ।
द्यूतक्रिडेचे जुवारी जगदानीचे गुण गाती ।
रांधवणीया बहु वेधल्या तैल्यकारा स्थिति ॥२॥
राहेर नांदेड प्रांत जीवविले प्राणी अनेक |
चोर खिरारी गोवारी लाहासी अरण्य महिख ।
ठाकूर भार्या कळावी बिरवणे सिध्द वऱ्हाडिक ।
पहुड उकरडा भगवे दोन्ही मठपती एक ॥।
विष्णू स्वामीची गुटीका सिध्दी आंब उच्चारिती ॥
द्विज गोरक्षण राणभेरी गोपचोंडी लपविती ॥३॥
वेठी जाणे अधिकार्या अन पुन्हा अळजपूर ।
वडनेराहुनी आंबजई वासनी आलेगाव पातुर ।
विषयी आंजनी मेहकर करुनी दुबार लोणार ।
त्र्यंबक यात्रे पव्हा निघाला करीत गंगातीर ।
सप्तवार घटी कर लावुनी चोर कुमती हरती ।
जन्माष्टमीसी पूजा महीषा युध्द निवारिती ॥ ४ ॥
रामसगावाहुनी आला पैठणी देव बाईसाचा ।
क्षौर भोगावती विडा उचलीला जीव उद्धरण्याचा ।
प्राकृत छंदामध्ये गाईला एकांक श्रीहरीचा ||
श्रीदत्ताचा मंत्र सुत अन सेवक ऋषीमुनीचा ।
त्रिकाळ लीळा स्मरण करीता रोग बाधा जाती ।
जन्म मरण फेरा चुकोनी होय ईश प्राप्ती ॥५॥