ऊठ रे ऊठ बापा करी कृपा
ऊठ रे ऊठ बापा करी कृपा निजानंद स्वरूपा ॥धृ॥
उठोनी स्वामी प्रातःकाळी, जटाजूट श्रीमुगुट झळाळी ।
जीव पडले अनाथमेळी, कृपादृष्टीने तू सांभाळी ।
सखया निजरूपार, निजानंद स्वरूपा ॥१॥
अविनाशी तू परात्पर, अलक्ष लक्षा न कळे पार ।
मायेपरता अगोचर, ऐसे बोलति सिद्धांत सार ।
तटस्थ जाहले अरूपा२, निजानंद स्वरूपा ॥२॥
चहुयुगी तू स्वामीराया, राज्य करीसि प्रताप सखया ।
जळचर जड जीव वंदीति पाया, अनाथनाथा करावी दया
येऊ दे तुजला अनुकंपा२, निजानंद स्वरूपा ॥३॥
नाम तुझे हे अनार्जित, नाही अर्जिले म्या किंचित |
दास केशव शरणांगत, पूर्ण करावा माझा हेत ।
तन मन धन अर्पण तुज बापा २, निजानंद स्वरूपा ॥४॥