उठा उठा श्रीचक्रधर राया
उठा उठा श्रीचक्रधर राया, भक्त वाट पाहाती ।
पदरी घेउनि पवित्र करुनि भक्ती देइजो जी ॥धृ॥
धरणी आशंसी स्पर्श व्हावया आपुल्याश्रीचरणाचा
विरहाग्नीने तप्त जाहली शीतल किजो जी ॥१॥
प्राण उतटुनि कंठा आणी आर्त नाही तैसी ।
औदार्याचा सिंधु माझा प्रेम देइजो जी ॥ २ ॥
प्रातःकाळी प्रभुजी उठले कृपादृष्टी वळली ।
तळमळ करिते भक्त तारिले तैसे तारिजो जी ॥३॥
अनंत सृष्टी हिंडत आलो बहु श्रम आला जी ।
कठिण कोरडा कधी मी तुमच्या पदरी पडेनजी ॥४
अनंत वेळा प्रमाद जोडुनि खंती आणिली जी ।
ऐसा मी अपराधी कैसा योग्य होईन जी ॥५॥
निमित्त बंधु महादानी तू औदार्य रावो ।
पाहू नका तुम्ही अपात्रता ही वरदान देइजो जी ||६
कवीने आपुले सुगंधहीन हे पुष्प वाहिले जी ।
सुगंधहीन ते सुगंधी करुनि श्रीकरी घेइजो जी ॥७॥
उठा उठा श्रीचक्रधर राया, भक्त वाट पाहाती ।
पदरी घेउनि पवित्र करुनि भक्ती देइजो जी |धृ