मध्यान्ह पूजावसर

एवं प्रपूर्ण घटिका अथवा तदर्ध ।
पद्मासनी स्थित असे मग अंगणा ये ।
अंगी फुटा अतिसुसार सुरंग टोपी ।
वस्त्री पवित्र सगुणी मिरवे परात्मा ॥१॥
सर्वा अमंगळ दिशा निजदृष्टीपाते ।
सन्मंगळा करुनिया पुसे सेवकाते ।
कव्हणीकडे गमन आज कीजैल खेळा ।
कव्हणा प्रवृत्ती न कळे विन नागदेवा ॥२॥
नागेंद्रपाणि धरुनि स्वकरे परेशु ।
जे विहरणा निजसेवकासि ।
पद्मासनी स्थित कही परशास्त्र बोले ।
व्यापारवी अनुचराऽखिलकर्महंता ॥३॥
पाषाणभेदन झुंजे दरपूरणादि ।
पूरप्रवेश बहुधावन भूसमत्व ।
इत्यादि किल्मिषहरा परमोक्षकारा ।
क्रीडा करी प्रतिदिनी प्रभु जीवबंधु ॥४॥
उष्णोदकर विसर्जुनि आदिनाथे ।
तांबुळ संत्यजुनि दान दिजे स्वभक्ता ।
गंगोदके प्रभु करी गुळळा तदन्ती ।
विडा सुरंगित सुगंध मुखारविंदी ॥५॥
करी स्वनगराप्रति देवरावो ।
शुद्धात्म सेवक जनी परिवारिला जो ।
पुतःस्वधाम वर राजमठी प्रवेशे ।
पद्मासनी विरचिते करुणाब्धी बैसे || ६ ||
नागांबिका विमळ उष्णजळे पवित्रे ।
प्रक्षाळिजे चरणयुग्म सुलक्षणार्थ्ये ।
ते पादतीर्थ परमामृत सेविजे पै ।
भक्ती सदा सुरनरा न लभे कदा जे ॥७॥
गंडूष केळी परिसारुनि सर्व शुद्धा ।
प्रक्षाळिजे सुमुखपंकज पाणियुग्मा ।
सर्वांग मार्जन कही सपुरांचळे पै ।
कर्पुरवासित विडा वदनी पवित्री ॥८॥
आडा ललाटफळकी वरचंदनाचा ।
रेखी सुरेख बरवा प्रभुदासिका ते ।
स्तंभादि सात्विकता वरी नागमाता ।
मुक्ताक्षती परिकरे प्रभु अर्चिचे पै ॥९॥
धूपारती बहळ गंधवती सुदीपी ।
ओवाळिजे परममंगळ धूपदीपी ।
साष्टांगपूर्वक यथोचित सर्व भक्ती ।
तो वंदिजे परमवंद्य चिदादि सर्वा ॥१०॥
नागांबिका कृत सुपाक नवातिचित्रा ।
आरोगिजेऽमृत वराशन राजलीळा ।
शुद्धोदके मग कीजे गुळळा परेशे ।
तांबुळ वक्त्रकमळी मिरवे प्रभुचा ॥ ११ ॥
नागेंद्र किंकर सुपाणि धरी स्वहस्ते ।
वेढेकरी शतपदी परमांगणी जो ।
नागांबिका विरचितु शयनासनी जो ।
पहुडे स्वात्मरमणी प्रभु देवराजा ॥१२॥
नागांबिकादिक सुभक्तजनी समस्ती ।
प्रसाद भोजन किजेऽमृतवर्यरूपे ।
पूतः प्रपूत सुरसाळ रसा समस्ता ।
नित्यातिनित्य फळदायक शुद्धभावे ।।१३।।
जे निर्जरा परमदुर्लभ वांछिजे पै ।
उत्कंठिते वरमने परि लाहिजे ना ।
ते पूर्वसंचित गुणेऽनुचरी समस्ती ।
की सेविजे प्रतिदिनी प्रभुभुक्तशिष्टा ||१४||
नागांबिका प्रभुपदांघ्री सरोजयुग्मा ।
प्रक्षाळुनि मृदु करी संवहान कीजे ।
विश्रामकेळीकृत ईश परात्ममाया ।
शय्याधिरूढ परमात्म सुखाभिराम ॥ १५ ॥
निद्रा विसर्जुनि मळापहरुनि शौचा ।
शुद्ध स्वीकार करुनि प्रभु निर्मळात्मा ।
जे करी परम उंचमठा पवित्रा ।
पद्मासनी स्थित परावर शास्त्रवक्ता ॥ १६॥
नागार्जुनादि मुनिराज सुभक्त सर्वे ।
परस्परे प्रतिविवेक कथा स्वकीया ।
सर्वेश्वराऽखिलविदाप्रति सांगता पै ।
कुत्रापि खंडन कदापि तदंगिकारु ॥१७॥
कदापि अन्यकथने श्रवणे समस्ता ।
शिक्षापुनि प्रभु कथी स्वकथा महात्म्य ।
नागार्जुनाप्रति कही कथुनि त्रिशुद्धी ।
पावी परावर विवेक सुनिश्चयाते || १८ ||
यानंतरे प्रभु कृपा करी सेवकाते ।
माधुकराटन विधीप्रति पाठवी पै ।
ते भैक्ष्य केवळ सुधा प्रभुदृष्टपूत ।
स्थापुनि मंगळ विधान विलोकिजे पै ॥१९॥
तो जीवजीवन सुपूजित सर्व भक्ती ।
कैवल्यमूर्ती गुणधाम सुगौर कांती ।
वेगा प्रसन्न वदने मज दृष्ट होता ।
प्रत्यक्ष तैच पुरति जीवीची अवस्था ||२०||
।। इति मध्यान्ह काळ पूजावसर संपूर्ण ।।